Featured Posts
Recent Posts

"सर , आपलीपण शाळा आता सुंदर झाली!"-प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम फलनिष्पत्ती (यशोगाथ

चंद्रपूर जिल्ह्यास लागून वर्धा जिल्ह्यातील शेवटचे टोकावर पोथरा नदीचे तीरावर वसलेले सुमारे 1400 लोकवस्तीचे 'लाडकी' गाव.2014-15 या सत्रात उच्च प्राथमिक शाळा लाडकीची जुनी इमारत धोकादायक ठरू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यामूळे सर्वच वर्ग नवीन इमारतीत स्थलांतरित करावे लागले. नवीन झुडूपी जागेत समायोजन करणे स्वप्नवत ठरावे अशीच काहीशी स्थिती होती. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी मंडळी यांचा विकासात्मक कार्यात नकारात्मक प्रतिसाद कदाचित सुसंवादाच्या अभावामुळेच निर्माण झाला होता. शाळा व तत्सम विषय काढताचअनास्थेचाच प्रत्यय येत होता. हे वातावरण बदलेले पाहिजे असे वाटत असले तरी. त्यास निदान 7-8 वर्षे लागतीलच हा प्राथमिक अंदाज होता. आमचे 2 वर्गखोल्या इमारत बांधकाम अंतिम टप्प्यात होते.शाळा इमारत बांधकामातनिदान वर्गखोलीचे अंतरंग तरी करता रंग रंगोटी करता येईल हा विचार मनात आला पेंटरची शोधाशोध सुरू झाली श्री. विजय थुल ह्या काहीश्या महागड्या परंतू अत्यंत तरबेज कलाकारास मनधरणी करून आमंत्रित केले ,सुशोभीकरणास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात सुमारे ₹ 30000/- खर्च केल्यानंतर वर्गखोल्या आकर्षक दिसू लागल्या कलाकाराने जीव ओतून चित्रांमध्ये जीवंतपणा आणला.भिंती बोलत्या झाल्या.हळूहळू शाळेत सकारात्मक बदल येत आहे ईकडे पालकांचा कटाक्ष पडू लागला. केंद्रप्रमुख बोभाटे ताई एके दिवशी नेहमी प्रमाणे शाळा भेटीस आल्या वर्गखोल्या पाहून पर्यवेक्षिय अधिकारी यांचे तोंडून आमच्या शाळेबद्दल पहिल्यांदाच 'सुंदर!' शब्द आमच्या कानी पडला असावा. आता पुढे काय? हा प्रश्न अस्वस्थता निर्माण करीत असतानाच स.अ. श्री. प्रफुल्ल तेलतुमडे यांनी स्वखर्चाने आपला वर्ग सुशोभित ,निटनेटका ,प्रभावी केला. शाळेविषयी अनास्थेमुळे शाळा परिसरात घाण, तोडफोड, शालेय सुविधेस नुकसान पोचविणे हे प्रकार नित्याचे झाले होते. करिता कुंपण करणे गरजेचे होते. त्याकडे श्री. संजय हेपट सरांनी जाणीव पुर्वक लक्ष घालून श्री भगत सरांना सोबत घेऊन जाळीदार संरक्षक कुंपण करण्यात पुढाकार घेतला. आता व्रुक्षारोपण करण्याचा मार्ग सुकर झाला. ही सर्व कामे शासन अनुदान व आम्हा शिक्षकांच्या आर्थिक योगदानातून झालीत त्यात सर्वाधिक वाटा मु.अ.सौ. प्रभा बोरीकर यांचा होता. विकास कामे जोमाने होवू लागली परंतु लोकसहभाग हा प्रश्न अनुत्तरितच होता, सुसंवाद न होता वादच अधिक होत होता. शाळा ही केवळ शिक्षकांचीच अशीच भावना गावकऱ्यांची आहे असा प्रत्यय अडथळे आणित होता. अशातच एक कल्पना डोक्यात आली, शक्य तेवढा पालकांशी, सूज्ञ गावकऱ्यांशी संपर्क करायचा व त्यांना शाळेत सुरु असलेल्या सर्व उपक्रम व विकासात्मक कामाविषयी ऊहापोह करून केवळ ₹ 500/- एवढ रकमेकरिता आग्रह धरायचा. सहभागातून त्यांचे लक्ष शाळेकडे वेधून घेणे हा प्रमुख हेतू मनात होता.संपर्कांती असे लक्षात आले की गावातील काही मंडळी अनुकूल विचाराचे आहेत. चर्चा विचारविमर्ष ,विनंती नंतर 20-25 जणांनी होकार दिला परंतु मोजक्या लोकांनीच प्रत्यक्ष सहभाग दिला आम्ही परत बाह्य भागाची रंगरंगोटी करण्याचे ठरविले. मोजकीच रक्कम हातात असल्याने स्थानिक पेंटर श्री. सुरेश येडमे यांच्याकडून कमीत कमी मोबदल्यात करता येईल काय ह्या विचारात मी होतो. जुन 2012 पासून मी 'लाडकी' गावात कार्यरत आहे परंतु गावात सुरेश येडमे या स्थानिक कलाकाराशी माझा प्रत्यक्ष परिचय होवू शकला नाही.एकमेव कारण हेच की ही व्यक्ती स्वमग्न, वेडसर,विक्षिप्त स्वभावाची आहे अशीच माहिती वेळोवेळी कानावर पडायची आमच्या मुख्याध्यापिका सौ.बोरीकर मॅडम यांनी शाळेचे बाह्यांगाची रंगरंगोटी करण्यासाठी सुचित केले. तेंव्हा उपलब्ध रकमेतून जास्तीत जास्त काम कसे करता येईल या विचारात असतानाच लगतच्या 'चिचघाट' शाळेत सुरेशभाऊंचे काम सुरु असल्याचे समजले.अधिक चौकशी केली असता भाऊंच्या हातात कला आहे, पण भरवसा नाही असेच उत्तर मिळाले. तरी सुद्धा रिस्क घेऊन पाहण्यास हरकत नसावी असे सहकारी ज्येष्ठ शिक्षकांनी सल्ला मसलती अंती सुचविले. लगेचच दुसऱ्या दिवशी भाऊंना कामासंबंधी कल्पना देऊन त्यांचा कल घेतला असता होकारार्थी उत्तर देऊन तयारी दर्शविली परंतू डोक्यात विचारांची चलबिचल सुरु असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होते. काहीशी असुरक्षितता, आत्मविश्वासाची कमतरता दिसत होती. मी त्यांना आपुलकीच्या भाषेत विश्वास देण्याकरिता सर्वप्रथम त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी विचारपूस करून बोलते करण्याचा प्रयत्न केला. मला उत्तर मात्र मोजक्याच शब्दांत मिळत होते. कामाची सुरुवात करण्याचा दिवस ऊजाडला भाऊ सकाळी शाळेत आले. सर्व प्रथम मी त्यांना शाळेच्या नावाचा फलक शैक्षणिक लोगोसहित काढण्यास सांगितले .हात अतिशय सावध ,सावकाश चालत होता. फलक विशिष्ट चौकटीत बसविण्याकरिता भाऊंची चालू असलेली खटपटीचे मी क्षणोक्षणी अवलोकन करीत होतो. आपणास काय अपेक्षित आहे ते पटवून देण्यासाठी आटापिटा करत होतो. पण ती ट्युनिंग काही साधत नव्हती. शाळेच्या फलकाचे कच्चे आरेखन पाहता भाऊंना चित्र सुंदर काढता येते हे लक्षात आले. म्हणजे आपली निवड चूक नाही हे लक्षात आले. फलक फारसा आकर्षक झाला नाही तरी बोलका झाला त्यात रंगछटा टाकून श्रीगणेशा झाला. भाऊ दररोज येवून आपल्या कामगिरीवर कार्यमग्न होवुन आनंदीत दिसू लागले,कार्य व्यवस्थित व्हावे यासाठी मी सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहो, सतत हे असे नको तसे करा ह्या गोष्टी त्यांच्या व्यक्तीमनाला खटकत असत.परंतु त्यांनी एकदाही नकार दिला नाही वा उलट जबाब केला नाही. भाऊ निमूटपणे विनम्र राहून आपले काम करीत होते. अगदी 7-8 दिवसात सुरेशभाऊंचे मुखकमल आनंदमयी तेजाने प्रफुल्लित दिसू लागले. आत्मविश्वास वाढू लागला.मी सांगितले तसेच न करता ते स्वतःचे मत मला सांगू लागले.आज त्यांची कला सर्वांना दिसतच आहे. ह्या सर्व गोष्टी सुरू असतांना माझ्या अंतर्मनात प्रश्न वारंवार ऊफाळून येत होता. हा व्यक्ती तथाकथित वेडसर पध्दतीचे आचरण का करीत असावा? थोडी फार केस स्टडी केली असता मी या निष्कर्षाप्रत पोचलो की या व्यक्तीस प्रेम ,आपुलकीची वागणूक देऊन आत्मविश्वास वाढला तर हा व्यक्ती स्वावलंबी निश्चितच होवू शकेल. सुरेश येडमे यांच्या सोबत वीस-पंचवीस दिवसांत त्यांच्या व आमच्यामध्ये आदरयुक्त स्नेह निर्माण झाला. तेंव्हा या स्नेहापोटी तसेच त्यांच्या सेवा सहकार्याबद्दल त्यांना एका विशेष उद्देशाने आम्हा शिक्षकांकडून मोबाईल फोन स्वातंत्र्यदिनी भेट केला.सुरेशभाऊ आजही आमच्या सोबत काम करत आहेत. ते सतत अल्प मोबदल्यात सेवा देत आहेत. त्यांच्या अनमोल सेवेने अकल्पनीय संस्कारक्षम वातावरण निर्माण झाले आहे. सर्व गोष्टी कशा समांतरपणे आकारू लागल्या मुले सहजगतीने शिक्षण घेण्यासाठी तत्पर झाले. यानंतरचा टप्पा होता अद्ययावत द्रकश्राव्य साधनांची उपलब्धता व वापर.शाळेत सहा संगणक संच संगणक कक्षात ठेवले होते ते सर्व दुरूस्ती सह प्रत्येक वर्गखोलीमध्ये स्थानांतरित केले. सहकारी शिक्षक श्री. तेलतुमडे यांनी याबाबतीत स्वतः लक्ष घालून शैक्षणिक ऑडिओ व्हिज्युअल साहित्य डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. संगणकाचा दररोज वापर होवू लागला. मुले स्वतः संगणक हाताळू लागले आहेत. भितीमुक्त वातावरणात सहजशिक्षण होत आहे. अगदी १ली इयत्तेतील मुलेसुध्दा स्वयंप्रेरणेने संगणक चालवतात यापेक्षा मोठी उपलब्धी काय ठरावी. ज्ञानरचनावादी संकल्पनेतून अनेकाविध अनुभवांद्वारे बालस्नेही शिक्षणाचा आनंद घेऊ लागलेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या चळवळीमूळे गेल्या वर्षे दीड वर्षात शाळेत जो अचानक बदल झाला त्याने शिक्षक पालक सुसंवादास नवसंजीवनी मिळवून दिली आहे. यावर्षी मला सहा विद्यार्थी महत्प्रयासाने कॉन्व्हेंट मधून परत आणावे लागलेत. आजमितीस गावकरी मंडळीचा प्रतिसाद पाहता पुढील सत्रात पालक स्वतःहून मुलांना आमच्या शाळेत प्रवेश देतील अशी आशा आहे.शाळा झपाट्याने बदलली असे शब्द ऐकायला मिळत आहेत. 'आपली शाळा'ही जाणीव होत आहे.शाळेत होत असलेल्या उपक्रमांची चर्चा लोक करताहेत. मदतीचे हात पुढे येत आहेत.


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.